हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षण संदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये निर्णय झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, असा ठराव आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमताने मंजूरी देण्यात आली.
आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेला ठराव सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसींना वगळून घेऊ नयेत. हा ओबीसींवर अन्याय ठरु शकेल. त्यामुळे जोपर्यंत इम्पेरिकल डेटा मिळत नाही तोपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवारांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठरावाचे वाचन केले. त्यांनी हा ठराव सभागृहात मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठरावाला पाठिंबा दिला. आज घेतलेला ठराव निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे.