Wednesday, June 7, 2023

जनसंपर्क ठेवल्यामुळेच कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी – विश्वजित कदम

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

आघाडी शासनाच्या काळात युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट राहुल गांधी यांच्याशी संवाद साधून शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांचा लाभ दुष्काळी भागातील लोकांना मिळवून दिला. राज्यभर युवक काँग्रेसचे मजबूत संघटन करण्यासाठी सर्वोतोपरी परिश्रम घेतले .या कामगिरीची थेट कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दखल घेऊन माझ्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल आसद येथे अधिकरव जाधव प्रतिष्ठानच्यावतीने आमदार विश्वजित कदम यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मोफत सर्वरोग निदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोनहीरा खोऱ्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी आमदार मोहनराव कदम, सिनेअभिनेते विलास रकटे, सागरेश्वर सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ.जितेश कदम उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विश्वजित कदम म्हणाले आता पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून प्रदेश काँग्रेसच्या संघटनकार्यात सक्रिय राहणार आहे. यामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे .ही जबाबदारी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मित्रांच्या सहकार्याने समर्थपणे सांभाळणार आहे. युवकांचा प्रतिनिधी म्हणूनच प्रदेश काँग्रेसमध्ये सक्षमपणे काम करेन असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.