Sunday, June 4, 2023

कोरोना संसर्गाचा धोका अजूनही टळलेला नाही, ICMR आरोग्य तज्ज्ञांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हेरिएन्ट आणि पुढच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यामुळे पुन्हा सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे. ICMR च्या महामारी विभागाचे पूर्व हेड डॉ. रमन गंगाखेडकर यांनी लोकांना व्हॅक्सिन घेण्यास आणि कोरोना महामारी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.

डॉ. रमन गंगाखेडकर म्हणाले कि,”सध्यातरी कोणताही नवीन व्हेरिएंट समोर आलेला नाही. मात्र वृद्ध लोकं, ज्यांनी व्हॅक्सिन अजूनही घेतलेली नाही अशी लोकं आणि कोरोना संक्रमीत रुग्ण यांनी फेस मास्क लावला पाहिजे.” ते पुढे म्हणाले कि,” मला वाटत नाही कि या व्हायरसचे सध्याचे संक्रमण हे चौथी लाट असेल. मात्र जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएन्टच्या सब व्हेरिएन्ट BA.2 मुळे पुन्हा एकदा संक्रमण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे सुरक्षा म्हणून आपण सर्वानी मास्क घातला पाहिजे. तसेच संक्रमण होण्याचा धोका टळला आहे समजून बेजबाबदारीने वागू नये.”

याव्यतिरिक्त बाकीचे एक्सपर्ट्सही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचा सल्ला देत आहेत. हे लक्षात घ्या कि सध्या दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सहीत अनेक राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा देशात कोरोनाविषयी चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.