औरंगाबाद : चंदन चोरट्यांच्या हिम्मती बद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळतात मात्र औरंगाबाद शहरात ती प्रत्यक्षात पाहायला देखील मिळाली आहे. एका डॉक्टरांच्या बंगल्यात घुसून तीन चोरट्यानी त्या डॉक्टरांसमोरच चंदनाचे झाड कापले व ते घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्या चोरांना अनेक वेळा हाटकल्या नंतर देखील ते गेले नाहीत. शेवटी त्या हताश डॉक्टराने त्यांच्या समोर उभे राहून चोरीच्या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर शुट केला. ही धक्कादायक घटना आज पहाटे शहरातील पुष्पनगरी भागात घडली.
पुष्पनगरी भागात राहणारे डॉ.विवेक घारापुरे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोरटे दाखल झाले होते. आवाज झाल्याने ते झोपेतून उठले आणि हातात बॅटरी घेऊन त्यांनी परिसरात पाहिले असता दोन चोरटे चंदनाचे झाड कापत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्या दिशेने बॅटरीचा उजेड करून देखील निर्भय होऊन ते चोरटे झाड कापत होते. घारापुरे यांनी त्यांना हटकले देखील मात्र त्याचा काहीच परिणाम चोरावर झाला नाही.
दरम्यान, हाटकल्याने व बॅटरी मारल्याने परिणाम होत नसल्याने हताश झालेल्या घारापुरे यांनी शेवटी सर्व चोरीची घटना मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली. चोरांनी निर्भीडपणे ते झाड कापून घारापुरे यांच्या समोर घेऊन गेले. ही बाब समजताच गुन्हे शाखेचे पथक घटनस्थळी दाखल झाले होते. मात्र या प्रकरणी दुपार पर्यंत क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली न्हवती अशी माहिती निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांनी दिली. तर डॉ.घारापुरे यांनी बोलण्यास नकार दिला.