औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज परिसरात एका खासगी बँकेत काम करणाऱ्या शिपायास धाक दाखवून सुरक्षारक्षकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना बजाजनगरात उघडकीस आली. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगर परिसरातील कोटक महिंद्रा या बँकेत शहरातील संजय शिंदे (२४, नाव बदलले आहे) हा शिपाई म्हणून काम करतो. दरम्यान, २७ सप्टेंबरला बँकेतील स्वच्छतागृहात पाणी साचल्याने बँकेतील अधिकाऱ्यांनी संजय शिंदे यास साफसफाई करण्याचे आदेश बजावले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संजय शिंदे हा स्वच्छतागृहात साचलेले पाणी काढत असताना बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा अशोक भोसले हा स्वच्छतागृहात आला. यावेळी सुरक्षारक्षक अशोक भोसले याने शिपाई संजय शिंदे यास स्वच्छतागृहात पाणी कसे काढायचे ते मी तुला शिकवतो, असे म्हणून त्यास अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले. दारूच्या नशेत असलेल्या सुरक्षारक्षक भोसले याने शिपाई संजय शिंदे यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन स्वच्छतागृहात अनैसर्गिककृत्य केले.
या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी देऊन सुरक्षारक्षक भोसले निघून गेला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे घाबरलेल्या संजय शिंदे याने या घटनेची कुठेही वाच्यता न करता घरी निघून गेला. दरम्यान, दोन दिवसांनी संजय शिंदे अबोल राहत असल्याने त्यास विश्वासात घेऊन बँकेच्या व्यवस्थापकाने चौकशी केली असता त्याने सुरक्षारक्षक भोसले याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षारक्षक अशोक भोसले याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक गौतम वावळे हे करीत आहेत.