हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जमिनीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणातून मुलाने आई-वडिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात आई जागेवरच गतप्राण झाली, तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमित पांडुरंग नरुटे असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे .
शेतात पाईपलाईन जोडायला जाऊ असे म्हणून मुलाने आई अलका पांडूरंग नरुटे यांना शेतात घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर कपाळावर वार केले. या हल्ल्यात अलका नरुटे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर वडील पांडुरंग नरुटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. या वडिलांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला.
दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर मुलाचे वडील पांडुरंग नरुटे यांनी मुलाविरुद्ध इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी अमित नरुटे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे