तळेगाव : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये सासू-सुनेच्या होणाऱ्या किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने 22 वर्षीय सुनेने आपल्या पतीच्या मदतीने 45 वर्षीय सासूचा ब्लाउजने गळा आवळून खून केला आहे. हि मन हेलावून टाकणारी घटना तळेगाव शहरातील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. या प्रकरणी सून पूजा शिंदे तसेच तिचा पती मिलिंद शिंदे या दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
शुक्रवारी सकाळी पूजा आणि तिची मयत सासू बेबी शिंदे या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यामुळे सून पूजा हिला राग अनावर झाल्याने तिने रागाच्याभरात घरातील कापडी ब्लाउजच्या साह्याने सासू बेबी हिचा गळा आवळून खून केला. यानंतर पूजाने सासूचा खून केल्यानंतर तिने आपला पती मिलिंद यास सांगितले. यानंतर दोघांनी संगणमत करून मृत्यूमुखी पडलेल्या बेबी शिंदे हिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पोत्यात भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या छतावर एका कोपऱ्यात लपवून ठेवला. दोन दिवसांनंतर मृतदेह कुजू लागल्याने त्यास दुर्गंधी येऊ लागली. यानंतर आपण केलेला गुन्हा उघडकीस येईल या भीतीने या दोघं नवरा बायकोनी तो मृतदेह उचलून एका निर्जन ठिकाणी झाडा झुडपात फेकून दिला. पण पोत्या मधून येणाऱ्या दुर्गंधीने टेल्को कॉलनी येथील रहिवाशांचा संशय बळावला आणि त्यांनी या घटनेची कल्पना तळेगाव पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चौकशीसाठी मृत महिलेची सून पूजा शिंदे हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी तिला जरा आपला हिसका दाखवला कि तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिने हा खून सासूच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून केला होता. या प्रकरणात पूजाचा पती मिलिंद याचा ही सहभाग असल्याचे पूजाने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी मृत महिलेचा धाकटा मुलगा अमित शिंदे याने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.