हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण लागू केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. महिलांसाठी काम करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. हे दिन आपण दिमाखात साजरे करतो. पण हा सन्मान सर्वकाळासाठी हवा. तरच खऱ्या अर्थाने समानता नांदेल असे मुख्यमंत्री म्हणाले. आता चूल आणि मूलच्या पुढे जाऊन महिला पुरुषांच्या बरोबरीने पाऊल टाकत आहेत.“कोरोनाच्या संकट काळात, अत्यंत कठीण परिस्थितीत महिला पोलीसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांनी खूप उत्तम काम केले. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा”, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आपण महिलांना कसे सहकार्य करतो, त्यांना कसा आधार देतो हे राज्यकर्ते म्हणून पाहण्याचे आपले काम आहे. महिलांचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले का, त्यांच्यासाठीच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का, आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का हे पाहणे आपले कर्तव्य आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले