कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामध्ये 2 ते 8 जानेवारी या कालावधीत पोलीस उन्नत दिन सप्ताहात विविध कार्यक्रमाचे परिणामकारक व व्यापक स्वरूपात आयोजन केले जाते. त्या माध्यमातून जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. या अनुषंगाने गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल व अन्य वस्तू संबंधितांना परत केल्या जातात. कराड शहर हद्दीतील गहाळ व चोरीस गेलेले 4 लाख रूपयांचे 25 मोबाईल वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले.
कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड शहरात गहाळ व चोरीस गेलेले मोबाईल तसेच अन्य वस्तूंच्या बाबत सखोल चौकशी करून तपास करण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना देऊन चोरीस गेलेल्या मोबाईलच्या शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या टीम मधील सहाय्यक फौजदार सतीश जाधव, रघुवीर यादव, नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, रवी देशमुख, संतोष लोहार, रईस सय्यद सोनाली मोहिते या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तपास करून गहाळ झालेले व चोरीस गेलेले सुमारे 25 मोबाईल हस्तगत करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
कराड येथील पोलीस भवनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गहाळ झालेले मोबाईल संबंधितांची कागदपत्रे पडताळणी करून संबंधितांना देण्यात आले. संबंधितांनी मोबाईल परत मिळाल्याचा आंनद व्यक्त करुन वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आभार यावेळी मानले.