औरंगाबाद – शहरात मे महिन्यात आता सूर्य आग ओकत असून, काल चिकलठाणा वेधशाळेत 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यासह गेल्या दोन वर्षातील उच्चांकी तापमान ठरले आहे. मे महिन्यातील हे गेल्या पाच वर्षातील उच्चांकी तापमान असून, रणरणत्या उन्हामुळे आणि उकाड्याने जिवाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून शहरात 28 एप्रिल रोजी तापमानाचा पारा 42.4 अंश सेल्सिअस वर गेला होता. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान होते. परंतु हा उच्चांक अवघ्या काही दिवसात मोडला गेला आणि नव्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. काल एकाच दिवसात तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली. चिकलठाणा वेधशाळेत रविवारी 40.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
एप्रिल महिन्यातही नागरिकांना उच्चांकी तापमानाला सामोरे जावे लागले. आता मे महिन्यातही शहरवासीयांना उन्हाचा तडाखा बसत आहे. रणरणत्या उन्हातून ये-जा करताना उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक अनेक प्रयत्न करत आहेत.