औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असून यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवडाभरापासून राजकीय वादंग उभे राहिले असले, तरी रात्री 12 वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.
या अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील येतील असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
12 वाजेपर्यंत परवानगी –
सोहळ्यासाठी वाद्य आणि साउंडला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी दिली. मनपाने चव्हाण यांच्याकडे परवानगीसाठी विनंती केली होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विशेष अधिकारातील तीन दिवसांपैकी 18 फेब्रुवारीला पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान परवानगी दिली आहे.