हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांत फॉक्सकॉननंतर आता टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला आहे असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीका केली असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र हा प्रकल्प ठाकरे सरकारच्या काळातच गुजरातला गेल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदय सामंत म्हणाले, आदित्य ठाकरेंनी केलेले विरोधक म्हणून आम्हाला अपेक्षितही आहेत. मात्र यामुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करू नये ही माझी विनंती आहे. २१ सप्टेंबर २०२१ ला म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचा MOU झाला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालं होतं. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असं मी म्हंटल होत पण आता शिळ्या कडीला ऊत आणून काहीही उपयोग नाही. हा प्रकल्प परत महाराष्ट्रात यावा यासाठी गेल्या सरकारकडून साधं एक पत्रही केंद्र सरकारकडे गेलं नाही, असा उलट आरोप उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसवले असल्याचा थेट आरोप त्यानी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या राजकीय स्वामींसमोर नमल्याबद्दल आणि महाराष्ट्रातून प्रकल्प गमावूनही त्याला विरोध न करता गुजरातचा महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत अशी टीका महेश तपासे यांनी केली