छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. हि मारहाण नेमकी कशामुळे करण्यात आली याचे कारण ऐकले तर तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जन्माष्टमीनिमित्त उपवास ठेवल्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
या शिक्षकाचे नाव चरण मरकाम असे आहे. चरण मरकाम हे रायपूरपासून 200 किमी दक्षिणेकडील कोंडागावमधील गिरोला भागातील एका सरकारी शाळेत शिकवित होते. गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही घटना समोर आली आहे. या शाळेतील शिक्षकाने सातवी आणि आठवीच्या वर्गातील मुलांना मारहाण केली होती. यानंतर बुधवारी या शिक्षकाचं निलंबन करण्यात आलं आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शिक्षकाने जेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं की ज्यांनी जन्माष्टमीनिमित्त उपवास ठेवला आणि देवाचं अनुष्ठान केलं त्यांनी हात वर करा. यानंतर ज्यांनी उपवास केला होता, त्यांना शिक्षकाने मारहाण केली आहे. अद्याप या शिक्षकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.