शहराचे तापमान गेले 40 अंशांवर

औरंगाबाद – मार्च महिन्यातच औरंगाबादकरांना उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागत असून काल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस वर पोहोचला होता. गेल्या दहा दिवसात दुसर्‍यांदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील चार दिवसात तापमानाचा पारा 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

शहरात 18 मार्च रोजी 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानाचा पारा 38 ते 39 अंशादरम्यान राहिला. चिकलठाणा वेधशाळेत काल कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

चार दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. उकाडा जाणवत असून दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे.