‘या’ महानगरपालिका पोटनिवडणुकीत महाआघाडीत झाली बिघाडी, भाजपही रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा ‘अ’ च्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने महाआघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीची ही जागा खुली झाल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, वंचित आघाडी, अपक्षांसह 12 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे.

माजी महापौर स्व.हारूण शिकलगार यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पूर्वी ही जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ही जागा खुली झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी तेरा अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देत काँग्रेसच्या उमेदवारालाच विजयाचा गुलाल लागला पाहिजे असे आवाहन केले होते.

त्यानंतर सोमवारी या प्रभागातील काँग्रेसचे नेते माजी महापौर हारुण शिकलगार यांचे पुत्र तोफिक शिकलगार यांनी अर्ज दाखल केला. त्यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर त्यांना डमी म्हणून त्यांचे बंधू इरफान शिकलगार यांनी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना देखील राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून उमर गवंडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शिवाय शिवसेनेने देखील प्रभाग क्रमांक सोळाची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. पोटनिवडणुकीसाठी महेंद्र चंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी एबी फॉर्म दिला आहे.