सातारा | निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 8 पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.2 मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.
प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 8 पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली अधिक गतीमान होणार आहेत. यामध्ये अ वर्गातील सातारा, ब वर्गातील कराड व फलटण, तसेच क वर्गात महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या नगरपालिकांचा समावेश होत आहे. या मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती आहे. पालिकांच्या अ, ब, क व ड वर्गवारीनुसार 208 सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यानुसार दोन मार्चपासून प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे 7 मार्च, प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकांच्या कार्यालयात तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करणे 10 मार्च, या कच्च्या प्रारुपावर हरकती, आक्षेप मागविण्यासाठी 10 ते 17 मार्च मुदत राहणार आहे. दाखल झालेल्या हरकती, आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी 22 मार्चपर्यंत मुदत असेल. हरकती व आक्षेपावर अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्याची मुदत 25 मार्च असेल. राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस 1 एप्रिलपर्यंत मान्यता देणार आहे. 5 एप्रिलला जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.