आमची संपत्ती घ्या, पण वडिलांचा जीव वाचवा आर्ततेने डाॅक्टर गहिवरले ः मात्र बेड नाही मिळाला

साताऱ्यात बेड न मिळाल्याने घरातच बाधितांचा मृत्यू

सातारा | साताऱ्यात वडिलांना दिवसभर फिरवूनही बेड न मिळाल्याने मुलगा आणि सून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात रिपोर्ट घेऊन गेले. तेथील डाॅक्टरांना रिपोर्ट दाखवून दोघेही रडू लागले. आमची संपत्ती घ्या; पण वडिलांचा जीव वाचवा, अशी विनंती त्यांनी डाॅक्टरांना केली. यावेळी डाॅक्टरांनाही गहिवरून आले. मी काहीच करू शकत नाही. ऑक्सिजनचा बेडच शिल्लक नाही. तातडीने त्यांना दुसऱ्या दवाखान्यात न्या, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र कुठेच बेड न मिळाल्याने अखेर वडिलांनी घरातच आपला जीव सोडला.

जिल्ह्यात कोरोनाने रौद्ररूप धारण केले असून, सध्या सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अनेकांना धावाधाव करावी लागत असतानाच साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडील कोरोनाबाधित असल्याने मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात बेडसाठी मुलगा दिवसभर फिरला. परंतु त्याला बेड मिळालाच नाही. सरतेशेवटी वडिलांनी घरातच जीव सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील विसावा नाका परिसरात एक कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील मुलाचे ७२ वर्षीय वडील शनिवार, दि. १७ रोजी दुपारी कोरोनाबाधित आले. त्यांना अचानक खोकला आणि धाप लागण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना कारमधून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, इथे त्यांना बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील सर्वच रुग्णालयांत जाऊन बेड शिल्लक आहेत का हे पाहिले; परंतु सगळीकडे त्यांना ऑक्सिजनचे बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. सरतेशवेटी वडिलांना घरात ठेवून मुलगा आणि त्यांची सून एका खासगी रुग्णालयामध्ये रिपोर्ट दाखविण्यास गेले. त्यावेळी त्यांनीही ऑक्सिजने बेड शिल्लक नसल्याचे सांगितले.

निराश होऊन मुलगा आणि सून घरी गेले. मात्र, रात्री एक वाजता वडिलांना पुन्हा त्रास सुरू झाला. खोकल्यातून त्यांच्या रक्त पडू लागले. धाप प्रचंड वाढली आणि क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या डोळ्यांदेखत वडिलांनी जीव सोडला. केवळ वेळेवर बेड मिळाला नाही म्हणून आपल्या वडिलांना जीव गमवावा लागला, याची खंत त्याच्या मनात घर करून राहिली आहे. साताऱ्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने अनेकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like