औरंगाबाद – औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे शहरासाठी मंजूर असलेली 1680 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी जिल्हासाठीच्या विविध योजना आणि विकासकामांवर दोघांमध्ये चर्चा झाली. मंत्री, देसाई यांनी, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड तालुक्यांतील औट्रम घाटातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या ठिकाणी सात किलोमीटरचा बोगदा तयार करण्याची गरज असून त्यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निधी मंजूर करून तत्काळ बोगद्याचे काम मार्गी लावण्याची मागणी यावेळी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शिर्डी-औरंगाबाद दरम्यान दुहेरी महामार्गाचे काम हाती घेतले असून त्यासाठी विकास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्त करावी. डीएमआयसी अंतर्गत असलेल्या ऑरिक सीटीच्या विकासासाठी शेंद्रा ते बिडकीन दरम्यान चारपदरी महामार्ग तातडीने पूर्ण करण्यात यावा. तसेच औरंगाबाद ते पैठण दरम्यान चार पदरी महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी देखील मंत्री देसाई यांनी केली.
नवीन पाणी पुरवठा योजनेला गती मिळणार
औरंगाबाद-पैठण दरम्यानचा ४५ मीटर रुंदीच्या चारपदरी महामार्ग करण्यास मंजुरी मिळालेली आहे. याच मार्गालगत शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करायची आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी या मार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्याची गरज आहे, असे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. त्याला गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. दरम्यान, यामुळे शहराची पाणी पुरवठा योजनेला गती मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अजय सिंग उपस्थित होते.