नवी दिल्ली । कोरोना व्हायरसने जगात पुन्हा हाहाकार माजवला आहे. 2 महिन्यांपूर्वी रुग्णांच्या संख्येत अचानक घट झाली असताना, पुन्हा एकदा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांमध्ये एका दिवसात अनेक प्रकरणे समोर आली आहेत. भारतातही कोविडचा धोका पुन्हा वाढत आहे. दरम्यान, अमेरिकेशी संबंधित एका बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे विमानात एक महिला कोविड पॉझिटिव्ह आढळून आली, त्यानंतर तिने धक्कादायक पाऊल उचलले.
अलीकडेच, शिकागो, अमेरिकेहून आइसलँडला जाणार्या मारिसा फोटिओ या शाळेच्या शिक्षिकेसोबत एक धक्कादायक घटना घडली, ज्यानंतर ती चर्चेत आली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, मारिसा विमानात प्रवास करत असताना अचानक तिला कोरोनासारखी लक्षणे जाणवू लागली. विमान अटलांटिक महासागर पार करत असताना तिचा घसा दुखू लागला. तिने तातडीने विमान कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.
विमानातच महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली
तिची रॅपिड लॅटरल फ्लो टेस्ट फ्लाइटमध्येच करण्यात आली होती ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली होती. तिला आयसोलेट करण्यासाठी विमानात पुरेशी जागा नव्हती, त्यामुळे मारिसाने स्वतःला विमानाच्या बाथरूममध्ये सुमारे 4 तास आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला. इतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन तिने हे पाऊल उचलले.
बाथरूममध्ये घालवले 4 ते 5 तास
महिलेने आपल्या स्टेट्मेंट्मध्ये म्हटले की- “मी विमानाच्या बाथरूममध्ये 4-5 तास घालवले यावर माझा विश्वास बसत नाही. मात्र आपल्याला आवश्यक ते करावे लागेल. मी माझी टेस्ट बाथरूममध्येच घेतली आणि त्यामध्ये दोन लाईन दिसताच मी घाबरले कारण मी पॉझिटिव्ह आले. यानंतर मी लगेच विचार केला की विमानात सुमारे 150 लोकं आहेत, माझ्यामुळे ते संक्रमित होऊ नये म्हणून मी आयसोलेट होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मारिसाने बाथरूममध्ये आयसोलेट झाल्यानंतर स्वत:चा एक व्हिडिओ बनवला आणि नंतर तो टिकटॉकवर शेअर केला, जो रिपोर्टनुसार आतापर्यंत खूप लोकप्रिय झाला आहे. रिपोर्टनुसार, मारिसा आता 10 दिवस आइसलँडमध्ये क्वारंटाईन आहे. त्याच विमानात तिचे वडील आणि भाऊही होते. दोघांचे रिपोर्टस निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आइसलँडच्या पुढे स्वित्झर्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.