हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन संसदीय इमारतीत कामकाज सुरू केले जाणार आहे. नवीन इमारतीत कामाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाची विधेयक अधिवेशनात मांडली जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे, आज अधिवेशनात कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल महिला आरक्षण विधेयक सादर करणार आहेत. परंतु हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्याच्यावर उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी चर्चा केली जाईल. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल.
महिला आरक्षण विधेयक
आज अर्जुनराम मेघवाल यांनी महिला आरक्षण विधेयक सादर केल्यानंतर त्याच्यावर उद्या संसदेत सखोल चर्चा केली जाईल. या चर्चेमध्ये सत्ताधारी पक्ष विधेयकाचा मसुदा सादर करेल, त्यानंतरच त्यावर खासदार आणि विरोधक आपली बाजू मांडतील. यानंतर परवा हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल. राज्यसभेत या विधेयकावर सविस्तर चर्चा होईल. चर्चेदरम्यान हे विधेयक जर लोकसभेत मंजूर झाले तर त्याला पुढे राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर केले जाईल.
180 जागांवर दुहेरी सदस्यता
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकार नक्कीच कोणता तरी डाव साधेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण या विधेयकात 180 जागांवर दोन खासदार निवडले जाण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ज्यामध्ये एका महिला खासदारासोबत दुसरा देखील खासदार असायला हवा अशी भूमिका मांडण्यात आली आहे. म्हणजेच या विधेयकातून महिला आरक्षणाचे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामध्ये एक तृतीयांश जागा आणि दुसऱ्या जागा अशा प्रकारचा क्रम लावला जाईल. या 180 जागांवर दुहेरी सदस्यता ठेवली जाईल ज्यामध्ये एससी, एसटीच्या समुदयांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित राहतील. पुढे जाऊन 2027 मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या जागांमध्ये वाढ केली जाईल. परंतु तेव्हाही एका जागी एक खासदार अशी अट कायम असेल.