सांगली | वाळवा तालुक्यातील इटकरे येथे कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भितीने निखिल लक्ष्मण भानुसे (वय – २८) या तरुण अभियंत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या सांगली जिल्ह्याबरोबर वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याने वाळवा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निखिल हा सिव्हिल इंजिनियर होता. तीनच महिन्यापुर्वी त्याचा विवाह झाला होता. चारच दिवसांपुर्वी त्याला कोरोनाचा संसर्ग होऊन अहवाल पॉझिटीव्ह आल्यापासून तो अस्वस्थ होता. त्याच नैराश्यातून त्याने बुधवारी रात्री उशीरा घरासमोरील जनावारांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
युवा इंजिनियरने धक्कादायक पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद नातेवाईकांनी कुरळप पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. निखिलच्या पश्चात पत्नी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.