औरंगाबाद : ऑनलाइन बिझनेसचे आमिष दाखवून मैत्रिणीलाच दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मे 2021 मध्ये घडला. यासंदर्भात हर्सूल ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा कैलास पाटील व अमरेंद्र कुमार अशी आरोपींची नावे आहेत.
उषा रामदास वाढेकर या हैदराबाद येथील एका हेल्थकेअर सोल्यूशन कंपनीत ऑनलाइन काम करतात. त्यांची आरोपी हर्षदा पाटील हिच्याशी चार वर्षांपासून ओळख आहे. ती 2017 ते 2020 या कालावधीत औरंगाबादेतील गेम्स हेल्थकेअर या कंपनीत काम करीत होती. सध्या ती मुंबईत खासगी नोकरीला आहे. 14 मे 2021 रोजी तिने उषा यांना फोन केला. कस्टडिडक्शन व डिजिटल डिस्ट्रप्शनमध्ये ऑनलाइन बिझनेस करीत असल्याचे सांगून बिझनेस करायचा का? अशी विचारणा केली. तिच्यावर विश्वास ठेवून उषा यांनी होकार दिला. 20 मे 2021 रोजी तिच्या खात्यावर दोन लाख रुपये पाठविले. झूमवर सात दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण झाले. अमरेंद्र कुमार याने प्रशिक्षण दिले.
तेव्हा कंपनीचे नाव क्युनेट विहान डायरेक्ट सेलिंग इंडिया प्रा. लि. असे असल्याचे समजले. कंपनीची ऑनलाईन माहिती घेतल्यावर खात्री पटली. परंतु, त्यांचा आलेला बाॅंड वाचल्यानंतर यातून काहीही रिटर्न येणार नसल्याचे लक्षात आले. त्यावर पैशांची मागणी केली असता उषा वाढेकर यांना पैसे परत करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर हर्सूल ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास उपनिरीक्षक खिल्लारे करीत आहेत.