औरंगाबाद : सर्वत्र नववर्षाच्या उत्साहात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले. मात्र, एका सोन्याच्या दुकानदाराला नववर्षाच्या स्वागता निमित्ताने केक कापण्याचा घेतलेला कार्यक्रम चांगलाच महागात पडला आहे. हा कार्यक्रम सुरू असताना बुरखाधारी महिलेने तब्बल दीड लाख रुपये किंमतीची हिरे व मौल्यवान नवरत्न जडीत सोन्याची बांगडी लंपास केली.
जलनारोड वरील मोंढा नाका भागात असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड या दुकानात शनिवारी महिला चोराकडून ही चोरीची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी, संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास नववर्षा निमित्ताने दुकानात केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान, एक बुरखाधारी महिला दुकानात दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने आली. ‘मुझे जल्दी जाना है, असे म्हणत महिलेने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह गायकवाड यांना सोन्याची हिरेजडित बांगडी दाखवण्यास सांगितले.
गायकवाड यांनी अनेक प्रकारच्या महागड्या बांगड्या दाखविल्या. काही वेळाने महिला दुकानातून निघून गेली. मात्र, रविवारी 24 ग्रॅम 500 मिलीची एक हिरेजडित बांगडी गहाळ असल्याचे निदर्शनास आल्याने दुकानातील सीसीटीव्ही चेक केली असता बुरखाधारी महिलेने नजर चुकवत बांगडी लंपास केल्याचे समोर आले.
त्यानंतर त्यांनी चोरीच्या घटनेची वरिष्ठांना आणि पोलिसांना माहिती दिली. रविवारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार महिलेला संशयित म्हणून ताब्यात घेतले. सदर महिलेला यापूर्वी सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. जिन्सी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक तांगडे करीत आहेत.