शेतकरी आंदोलन: …तर पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वत: जाऊन शेतकऱ्यांशी बोलतील!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ सुरू असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनं दबावाखाली येण्याची गरज नाही. केवळ मनानं विचार करणं गरजेचं आहे. डोक्यानं नव्हे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. तसं आपण मानत असू तर शेतकऱ्यांचं ऐकायलाच हवं. आपण शेतकऱ्यांचं ऐकलं तर जग आपलं ऐकेल. त्यामुळं सरकारच्या मनात खरंच शेतकऱ्यांबद्दल आपुलकी असेल तर गृहमंत्री किंवा पंतप्रधान स्वत: जाऊन त्यांच्याशी बोलतील,’ असंही संजय राऊत म्हणाले.

‘आजचा बंद उत्स्फूर्त आहे. हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांबद्दलच्या कृतज्ञ भावनेतून आम्ही बंदला पाठिंबा दिलाय. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन तिथे उभे नाहीत. त्यामुळंच त्यांच्या मागे एकजुटीनं उभं राहणं व त्यांच्या भावनांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या बाजूनं कुठलंही राजकारण नाही. समोरूनही ते केलं जाऊ नये,’ असं संजय राऊत म्हणाले.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. अनेक राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांच्या बाजूनं मैदानात उतरल्यानं बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळला जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनंही बंदला पाठिंबा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment