हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आज नवव पुण्यस्मरण आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच विरोधकांवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडले. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय.
महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. मातृभूमीला वंदन करणारा, प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रुप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर लेक्चर देतात. तेव्हा लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवेच होते.
१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.
गुजरात दंगलीनंतर सारे जग मोदी हटाव, मोदी हटावच्या आरोळ्या ठोकीत असताना आणि त्या आरोळ्यांत भाजपचेच वरिष्ठ मंडळ सामील झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दमदारपणे म्हणाले, ‘छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल. हिंदूंची उमेद मरेल’, हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व. ओठात एक पोटात दुसरे हे धोरण होते. त्यात धोरणाचे ते तोरण बांधत राहिले,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.