सांगली प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मधील बंगळुरु येथील पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत सांगलीतील शिवसैनिक बेळगावला जाणारा असल्याचे शिवसेनेचे नेते आणि गुंठेवारी समितीचे राज्य प्रमुख चंदन चव्हाण यांनी जाहीर केले आहे. शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगाव मध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संतप्त पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आंदोलने करत निषेध नोंदविण्यात आला. मिरजेत शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या आणि फलकांना लक्ष करत तुफान तोडफोड केली. यानंतर शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
शेकडो शिवप्रेमी आणि शिवसैनिक बेळगाव मध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालणार असल्याचा इशारा शिवसेनेचे नेते चंदन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते हे आता पाहावे लागणार आहे.