Tuesday, June 6, 2023

शिवरायांची विटंबना करणार्‍या काँग्रेसची हकालपट्टी करणार का? – भाजप

सांगली प्रतिनिधी । राज्यातील शिवसैनिक दिशाहीन झाले असून राष्ट्रवादी छत्रपती शिवरायांचा दुधाने अभिषेक करुन बेगडी प्रेम दाखवत आहे. खरच तुम्हाला कणभर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान असेल, तुमच्या ह्दयात त्यांच्याविषयी स्थान असेल तर ज्या काँग्रेसने बेंगलोरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करणार का? असा सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.

पेठ येथे महाडीक शैक्षणिक संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विक्रांत पाटील म्हणाले, बेंगलोरमधील विटंबना प्रकरण काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केली असून काँग्रेसची पिलावळ कोणत्या थरापर्यंत जावू शकते हे सर्वांनी पाहिले आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हिंगोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली. राज्यातील शिवप्रेमींनी त्यांच्यावर शाब्दीक भडीमार केला परंतू शिवसेना, काँग्रस व राष्ट्रवादीने ब्र शब्द काढला नाही.

मिडीयात रोज तोंड वर करुन बोलणारे नवाब मलिक छत्रपती शिवरायांच्या जयघोषवेळी गप्प का बसले होते. महाराजांचा जयघोष न करणार्‍या राष्ट्रवादीच्या नवाब मलिक व विटंबना करणार्‍या राजू नवघरे यांना काळ्या शाईचा अभिषेक राष्ट्रवादी घालणार का हे सांगावे. शिवप्रेमाचा आव आणण्याचा प्रयत्न करु नये अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.