हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गुजराती नागरिकांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने राज्यातील 4 जिल्ह्यांत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. मात्र या बातमी मध्ये कोणतेही तथ्य नसून सुट्ट्या दिल्या नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कराड येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला सार्वत्रिक सुटी जाहीर झाल्याची बातमी गेल्या काही दिवसापासून सर्वत्र सुरु होती. विरोधकांनी यावरून शिंदे सरकारवर टीकेची झोडही उठवली होती. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही सुट्ट्या दिलेल्या नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी यापूर्वीच सरकारवर या मुद्द्यावरून टीका केली होती. हा निर्णय अनाकलनीय असून आम्ही 15 वर्षात सत्तेत होतो पण आम्ही कधी अशी पगारी रजा दिली नाही, असा नवीन पायंडा पाडणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्या पाकिस्तानमध्ये निवडणुका असतील तर पूर्ण देशाला सुट्टी जाहीर करणार का? असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.