सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
साताऱ्यात एकच चर्चा नक्की भंगार चोर कोण? याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे समर्थक रमेश उबाळे हे मेडिकल काॅलेजच्या जवळपास 1 कोटी रूपयांचा भंगार चोर कोण यांचा शोध घ्यावा, यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. याठिकाणी विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार महेश शिंदे यांनी एकाच वेळी आंदोलनस्थळी दाखल झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाले होते.
कोरेगाव तालुक्यातील या दोन्ही राजकीय नेत्याच्यात सध्या एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरु आहे. कालच पत्रकार परिषदेत आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांच्यावर टिका करत दरोडा टाकणारी लोकं असं म्हटलं होतं. तर काही दिवसापुर्वी महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केला होता. मात्र, साता-यातील नवं मेडीकल काॅलेज बांधकाम करण्यासाठी त्या जागेवर असलेल्या जुन्या इमारती पाडण्याचं काम सुरु आहे. मात्र, या कामातलं भंगार चोरल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांच्यावर करण्यात येत आहे. या प्रकारणी राष्ट्रवादी आ. शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्ता रमेश उबाळे आंदोलनाला बसला आहे. या ठिकाणी शशिकांत सुद्धा आज उपस्थित होते. यावेळी अचानक विरोधी पार्टीचे आमदार महेश शिंदे यांची या ठिकाणी एँण्ट्री झाली.
कृष्णानगर येथील आंदोलन स्थळावरून आ. शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्या समोरच थेट जिल्हाधिकारी यांना फोन फिरवत दोषींवर कारवाईची मागणी त्यांच्याकडं केली केली आहे. तर महेश शिंदे यांनी स्वत:कडे असलेली कागदपत्र दाखवत स्वत:ची बाजू कशी भक्कम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही आमदार समोरासमोर आल्यामुळं याठिकाणी थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. भंगार चोरी वरुन एकाच आंदोलनात दोन्ही आमदार मांडी घालून बसलेल्याने सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.