अजित पवार गटाची जोरदार तयारी; ‘या’ मंत्र्यांना दिली पक्ष बांधणीची जबाबदारी

ajit pawar group
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील कामाला लागले आहेत. अजित पवार गटाकडून नुकतीच निवडणूक प्रचारासाठी नेत्यांच्या जिल्हावार जबाबदाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतून अजित पवार गटातील कोणते नेते कोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळणार हे स्पष्ट झाले आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अजित पवार गट पक्ष मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी नव्याने संघटन बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, त्यांनी आपल्या नेत्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यासह राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर ३६ जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटन वाढीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी सर्व नेत्यांनी योग्यरित्या पार पाडली तर नक्कीच अजित पवार गटाला आगामी निवडणुकीत यश मिळू शकते.

कोणत्या नेत्यांकडे जबाबदारी

राज्यातील मंत्र्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये, अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मारावबाबा आत्राम या सर्व मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, अजित पवार हे पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर प्रफुल पटेल यांच्याकडे भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर असे पाच जिल्हे देण्यात आले आहेत.

यानंतर, छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर अशी प्रमूख शहरे देण्यात आली आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा जिल्हा देण्यात आला आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे देखील कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर असे तीन प्रमुख जिल्हे देण्यात आले आहेत. धनंजय मुंडे बीड, परभणी, नांदेड, व जालना या जिल्ह्यांची जबाबदारी सांभाळतील. तसेच, संजय बनसोडे हिंगोली, लातूर, उस्मानाबाद येथे संघटन बांधणी करतील.

यासोबत, अदिती तटकरे देखील रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर अशा मुख्य जिल्ह्यांमध्ये पक्ष आणि संघटन बांधणी करतील. तर, अनिल पाटील जळगाव, धुळे, व नंदुरबार या जिल्ह्यात प्रचार करतील. धर्मारावबाबा आत्राम हे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ अशा तीन जिल्ह्यांमध्ये संघटन बांधणीची जबाबदारी पार पाडतील. अशा सर्व मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातूनच आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाने जोरदार हालचाली सुरू केल्याचे दिसत आहेत.