मक्याच्या शेतात ‘चोर-पोलिसांचा’ खेळ ! दोन चोरट्यांना सिनेस्टाईल अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – रस्त्यावरून पायी चालत जाताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. असे चोरटे अत्यंत शिताफीने येऊन सोनसाखळी अथवा इतर मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढतात. पण औरंगाबादेतील देवगाव रंगारी याठिकाणी महिलाच्या गळ्यातील दागिने हिसकावणं दोन चोरट्यांना चांगलंच महागात पडलं आहे. चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी भामट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत मुसक्या आवळल्या आहेत.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच आरोपींनी यापूर्वी देखील अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगाव रंगारी परिसरात दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली होती. पोत चोरी केल्यानंतर हे चोरटे रस्त्याने पळत होते. दरम्यान पीडित महिलेनं आरडाओरडा केला आणि घडलेला प्रकार आसपासच्या लोकांच्या लक्षात आला.

या घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन चोरट्यांचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला. पण चोरटे मक्याच्या शेतात शिरले. याठिकाणी त्यांनी लपण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चोर पोलिसांचा हा खेळ रंगल्यानंतर पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांनाही मक्याच्या शेतातूनच अटक केली आहे. यावेळी घटनास्थळी अनेक लोकांची गर्दी जमली होती. जवळपास 50 ते 60 जणांनी पाठलाग करत दोन्ही चोरट्यांना पकडलं आहे. चोरीचा हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू होती. काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ देखील तयार केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.

Leave a Comment