मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक अजब चोरीची घटना घडली आहे. चोरांनी एका दुकानातून शेकडो चादरी चोरी केल्या आहेत. त्या चोरांना पोलिसांनी कांदीवली परिसरातून मुद्देमालासकट अटक केली आहे. पण चोरांनी दिलेल्या माहितीमधून वेगळंच समोर आले आहे. अटक केल्या दोघांची नावे मोहन पटवा आणि राहुल महाटो अशी आहेत. या दोघांनी दारू लुटायच्या उद्देशानं दरोडा टाकला होता पण त्यांना दुकानात दारू सापडली नाही म्हणून त्यांनी शेकडो चादरी लंपास केल्या.
अटक करण्यात आलेल्या चोरट्यांना कांदिवलीतील दरोडा टाकण्यात आलेल्या दुकानात दारुचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती दुसरीकडून मिळाली होती. लॉकडाऊनच्या काळात अवैध पद्धतीनं दारु विक्री केली जाते. म्हणून एका कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराने दारुचा साठा दुकानात दडवून ठेवल्याची माहिती चोरांना मिळाली होती. याचा फायदा घेऊन चोरांनी दुकानावर दरोडा टाकला पण जेव्हा त्यांनी दुकानाचे दार फोडले पण त्यांना दारू सापडलीच नाही. मग त्यांनी रिकाम्या हातानी माघारी जाण्यापेक्षा शेकडो चादरी चोरण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी या चादरी चोरी करुन जवळच्याच एका नाल्याच्या खाली मोकळ्या जागेत लपवल्या होत्या. त्यामधील काही चादरी त्यांनी कवडीमोल दराने विकून टाकल्या.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दोन्ही चोरांना बेड्या ठोकल्या आणि दोघांकडून १२० चादरी हस्तगत केल्या आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. “कांदिवलीतील एका दुकानातून शेकडो चादरी चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती.त्यानंतर आम्ही दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांची ओळख पटवली. त्यानुसार शोध घेऊन चोरांच्या मुसक्या आवळल्या आणि दोघांकडून १२० चादरी जप्त करण्यात आल्या आहेत” अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बाबासाहेब साळुंखे यांनी दिली आहे.