सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एका व्यापाऱ्याच्या हळदीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी २ लाख ३६ हजार रुपये किमतीची सेलम जातीची हळद लंपास केली. सदर चोरीची घटना हि गुरुवार दि. ०३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अण्णासाहेब रामू मालगावे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात हळदीची पोती चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. अण्णाप्पा मालगावे यांचे मार्केट यार्डातील पहिल्या गल्लीत मालगावे नावाचे हळदीचे अडत दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या गोडावूनमध्ये सेलम जातीच्या हळदची पोती ठेवलेली असतात. मालगावे हे नेहमी प्रमाणे बुधवार दि. ०२ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास दुकानबंद करून घरी गेले होते.
यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानावर पाळत ठेऊन गोडावूनच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडावून मध्ये ठेवलेल्या ४३ पोती सेलम जातीची हळद २ हजार ३६५ किलोची व २ लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीची हळद अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालगावे दुकानाचे शटर उघडून आत गेले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.