औरंगाबाद | एकाच सोसायटीतील तब्बल सात घरे फोडण्याचा प्रकार सोमवारी रात्री समोर आला. हा घटना केंब्रिज जवळील वरुडकाजी शिवारातील ओमीक्रोन सोसायटीत घडली. एका रात्रीत सात घरे फोडून लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
ओमीक्रोन सोसायटी तीन ते चार मजली 10 ते 15 इमारती आहेत. घरे बंद करून काही नागरिक बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी या घरांना टार्गेट केले. सोमवारी चोरट्यांनी या बंद फ्लॅटच्या कुलुपाच्या कड्या कापून घरातील दागिन्यांसह ऐवज लंपास केला. चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असताना एका रहिवाशाला जाग आली आणि त्याने सर्वांना जागी केले. नागरिक जागे झाल्याचे समजताच चोरट्यांनी धूम ठोकली.
या प्रकरणी मंगळवारी रात्री चिकलठाणा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक भागवत फुंदे, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक प्रदीप दुबे यांनी भेट दिली.