साताऱ्यात भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी पळवले तब्बल 14 तोळ्यांचे दागिने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथे दिवसेंदिवस घरफोडींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. येथील विसावा नाक्यावरील ‘ग्रीन व्हिला’ या बंगल्यामधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 14.50 तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किटे, 7.50 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच 1 लाख 25 हजारांची रोकड असा सुमारे 8 लाख 25 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील विसावा नाक्यावर डाॅ. सुषमा माने (वय 68) यांचा ग्रीन व्हिला या नावाचा बंगला आहे. दि. 13 रोजी सकाळी 8:45 ते रात्री 9 या वेळेत चोरट्याने माने यांच्या बंगल्यात दरवाजाचे लाॅक तोडून प्रवेश केला. यावेळी घरातील तब्बल 14.50 तोळ्यांचे दागिने आणि 1 लाख 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. रात्री उशिरा घरात चोरी झाल्याचे डाॅ. माने यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात याची तक्रार दिली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या चोरीची पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे करीत आहेत. दरम्यान, सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरफोडी होत असल्याने चोरट्यांचा पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.