देशमुखनगर | सातारा तालुक्यातील काशीळ येथील एका मंगल कार्यालयातून अनोळखी चोरट्याने विवाह सुरू असतानाच नवरीच्या दागिण्यावर डल्ला मारला आहे. सुमारे पाच तोळ्यांचे दोन 2 रुपये किमतीचे दागिने असलेली मुलाच्या आईची पर्स चोरट्याने पळविली. अंजली जितेंद्र चेला (वय- 61, रा. हडपसर, पुणे) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील अंजली चेला यांचा मुलगा निरंजन याचा विवाह कराड येथील आरती जाधव यांच्यासोबत होता. हा विवाहसोहळा काशीळ येथे महामार्गालगत असलेल्या एका मंगल कार्यालयात होता. कार्यालयात प्रेमविवाह होता, यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रीय पध्दतीने विवाह सोहळा पार पाडला. नंतर तेलगू रितीरिवाजाप्रमाणे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विवाह विधी सुरू होता. यावेळी मुलाची आई अंजली चेला यांनी नववधूला मानाच्या पाच कांजीवरमच्या साड्या व त्यांच्या पर्समध्ये असलेला सोन्याचा हार काढून ब्राह्मणाकडे दिला. या वेळी अंजली चेला यांनी त्यांची पर्स जवळच्या खुर्चीवरच ठेवली होती. ब्राह्मणांकडे साहित्य दिल्यानंतर त्या लगेचच पर्स घेण्यासाठी वळल्या असता त्यांना खुर्चीवर पर्स आढळून आली नाही. काही क्षणातच अनोळखी चोरट्याने खुर्चीवरील पर्स हातोहात लांबविली.
मंगल कार्यालयातून अनोळखी चोरट्याने सुटीच तोळे वजनाची सोन्याची चेन, दोन तोळे वजनाचे सोन्याचे हातातील ब्रेसलेट, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी व वाट्या, एक चांदीचा करंडा, एक मोबाईल, विविध बँकेचे डेविट व क्रेडिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना असा सुमारे 2 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पुढील तपास हवालदार प्रवीण शिंदे करत आहेत.