नाडे गावात पुन्हा चोरट्यांची दहशत : एका रात्रीत सलग तीन घरफोड्या

पाटण | तालुक्यातील नाडे गावात एकाच रात्री सलग दोन घरफोड्या करून भावाला धारदार हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन घरी पाहुणी आलेल्या बहीणीच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांच्या ऐवज सोन्याची चोरी केल्याच्या घटनेला अद्याप एक माहिना ही पूर्ण झाला नाही. अशातच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सलग तीन बंद घरे फोडण्याची घटना घडली. त्यामुळे एकाच महिन्यात सलग दोन वेळा चोरट्यानी नाडे परिसर टार्गेट केल्यामुळे नाडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पोलिसांपुढे मात्र एक आव्हान निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाडे पूर्व पांढरवाडी येथील हिराजी शंकर कारंडे, दत्ताजी गोविद कारंडे आणि यशवंत बंडू कारंडे हे कामानिमित्त मुंबई येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मात्र यांची मूळ घरे नाडे -पांढरवाडी येथे आहेत. घरांतील सर्वजण मुंबईला राहत असलेमुळे पांढरवाडी येथील यांची तीन ही घरे बंद असतात. नेमका याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी पाळत ठेवून वरील तिन्ही ही बंद घरांचे दरवाजे, गेट कटावणीने फोडून शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हिराजी कारंडे आणि दत्ताजी कारंडे यांच्या घरात प्रवेश केला घरांचे कुलूपे फोडून चोरट्यानी कपाटे उचकटली. मात्र यामध्ये काहीही हाताला लागले नसल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान शेजारीच असलेले यशवंत कारंडे यांच्या गेटचे कुलूप फोडले. मात्र शेजारील लाईट लागल्यामुळे चोरटे तेथूनच पसार झाले.

दरम्यान या तिन्ही ही घटनेत चोरट्यांचा हाताला काहीही लागले नाही. मात्र एकाच महिन्यात घडलेल्या सलग दुसऱ्या घटनेमुळे नाडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलिस, नाडे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार, पोलीस पाटील अण्णा पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिसांत कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.