हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सर्वत्र कोरोनाचा मोठा प्रकोप पहायला मिळत आहे. उपचारासाठी बेडही मिळत नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये जादा पैसे देऊन उपचार करण्याची वेळ कोरोनाबाधित रुग्णांवर आली आहे. अशात कोरोनाचा आता नवा प्रकार समोर आलेला आहे. तो म्हणजे म्युकरमायकोसिस या नावाचा एक नवा बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे या आजारावर कमी खर्चात उपचार घेता यावे म्हणून ठाकरे सरकारने या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे.
कोरोनाच्या कठीण काळात राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेत हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना अगोदरच राज्य शासनाने केल्या आहेत. आता नव्या स्वरूपातील म्युकरमायकोसिस या नावाचा एक नवा बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहे. याबात सुरतमध्ये काही दिवसांपूर्वी या आजाराचे तब्बल ४० रुग्ण आढळून आले आहेत. तर या आजाराची लागण झालेल्या ८ रुग्णांचे डोळेही काढावे लागले होते.
कोरोनाच्या या वाढत्या प्रसारात राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय कोरोनाबाधित रुग्णांसाठी नक्कीच काहीशा प्रमाणात दिलासा देणारा आहे. अलीकडच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नवनवे आजार उध्दभवत असल्याचे पहायला मिळत आहे. या गंभीर स्वरूपाच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती आहे. त्यामुळे या रोगावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
म्युकरमायकोसिसची अशी आढळतात लक्षण :
– डोळे किंवा नाक तसेच दोन्हीही आजूबाजूला लालसरपणा येणे, वेदना होणे.
– ताप येणे
– डोके दुखणे
– खोकला येणे
– दम लागणे
– रक्ताच्या उलट्या येणे
– तणाव जाणवणे