हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, असं जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं.
आव्हाड म्हणाले, “आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांनी दबावच टाकला. लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्या असा दबाव टाकला. गेल्या वेळी लॉकडाऊन उघडा, असं काही मंत्रीच म्हणायचे. पण सगळं आता आऊट ऑफ कंट्रोल जातंय. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीयत. म्हणजे लागणारच नाही. ज्याला हृदय आहे त्याला या चिता बघून झोप लागणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करावं, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आता याबाबत काय नियम आणायचे त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लोकं घराच्या बाहेर पडले नाही पाहिजेत. यासाठी जे करता येईल ते करावं लागेल.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलं. “राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.