हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकिय वर्तुळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच हिवाळी अधिवेशनाच (Winter session) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, येत्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरमध्ये विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. मात्र यावर्षी दिवाळी अधिवेशन फक्त दहा दिवसच चालणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपविण्यात येते. मात्र यावर्षी ते 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच संपत आहे. त्यामुळे दिवाळी अधिवेशन 10 दिवसातच का गुंडाळले जात आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
नुकतीच हिवाळी अधिवेशनाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. या दिनदर्शिकेत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज फक्त 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान चालणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. तर हिवाळी अधिवेशनाच्या कामकामाचा कार्यकाळ फक्त दहा दिवसांचा ठेवल्यामुळे राज्यात नविन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाना पटोलेंची टीका
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ फक्त दहा दिवसच ठेवण्यात आल्यामुळे त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस राज्याचे सरकार चालवत आहेत. विदर्भात हे अधिवेशन दोन महिने चालले पाहिजे असे म्हणणारे आज सत्तेत आहेत. फडणवीस आज सत्तेत आहेत. ते विदर्भाचे आहेत. त्यांनी अधिवेशन नागपूर करारप्रमाणे चालवले पाहिजे. हिवाळी अधिवेशन दोन महिने घेतले पाहिजे” असे नाना पटोले यांनी म्हणले आहे.
अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार?
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात, मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात जास्त गाजणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर, ड्रग्ज प्रकरण, राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर देखील चर्चा होणार असल्याची दाट शक्यता आहे.