औरंगाबाद | महिलेच्या नावाने बनावट पेâसबूक खाते तयार करून त्याद्वारे शहरातील एका सेवानिवृत्त रेक्टरला १९ लाख १४ हजार रूपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना सायबर पोलिसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केले. विजय तुळजाराम मुंगसे (वय ३०,रा.म्हमादेवी मंदिराजवळ, मस्तगड, जुना जालना), सय्यद अंन्सार सय्यद अख्तर (वय ३७,रा.शिस टेकडी, मोरंडी मोहल्ला, जुना जालना), संतोष विष्णू शिंदे (वय २१,रा.हनुमान टेकडी, मस्तगड, जुना जालना) अशी अटकेत असलेल्या भामट्यांची नावे असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी बुधवारी (दि.१) दिली.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजकल्याण विभागातील निवृत्त रेक्टर शामलाल गंगाराम चौधरी (वय ६८, रा. तिसगांव) यांना २०१९ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून स्नेहा जाधव नावाच्या महिलेशी ओळख झाली. होती त्यानंतर स्नेहा जाधव हिने शामलाल चौधरी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी करून १९ लाख १४ हजार रूपये उकळले होते. त्यानंतरही स्नेहा जाधव हि चौधरी यांच्याकडे पैशाची मागणी करीत होती. त्यामुळे शामलाल चौधरी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, जमादार खरे, सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, मन्सुर शहा, विजय घुगे, अमोल सोनटक्के, छाया लांडगे आदींच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासात चौधरी यांची फसवणूक करणाऱ्या विजय मुंगसे, सय्यद अंन्सार, संतोष शिंदे या तिघांना जालना येथून गजाआड केले.