सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे गाभा क्षेत्रात विना परवाना शस्त्रासह घुसलेल्या संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर या तिघांना रत्नागिरी न्यायालयाने 7 एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. प्रगणने साठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात आरोपी 31 मार्च रोजी दिसून आले.
याबाबत वन गुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयास तात्काळ माहिती दिली. खबऱ्या कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 1 एप्रिल रोजी हातीव-गोठणे -पुनर्वसन गावात तपास पथक पोहचताच गावात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्या वेळी कसून चौकशी केली असता संदीप तुकाराम पवार हा संशयित आरोपी आढळून आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चौकशी अंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विना परवाना शिकारीच्या उद्देशाने अप प्रवेश केल्याचे मान्य केले. 2 एप्रिल ला तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार रत्नागिरी येथील मंगेश कामतेकर व अक्षय कामतेकर या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले.