सातारा | खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक दीपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघाजणांना स्थानिक गुन्हे शाखेने पाच तासांच्या आत खंडोबाचा माळ येथून ताब्यात घेतले. या प्रणव शैलेश पाटोळे (वय 19, रा. खंडोबाचा माळ) आणि त्याच्या दोन साथीदारांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती स्पष्ट होत आहे. हे तिन्ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. शहरातील राजवाडा परिसरात गोल बागेजवळ बुधवारी दि. 9 रोजी रात्री अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. या गोळीबारामध्ये आप्पा मांढरे जखमी झाले असून त्यांच्या पोटात गोळी घुसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले असून या घटनेमुळे त्या परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, राजवाडा गोलबाग येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास आप्पा मांढरे सहकाऱ्यांसमवेत गप्पा मारत उभे असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयात हलवण्यात आले. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर तसेच शाहूपुरी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. गोल बागेजवळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून तातडीने तपासाला सुरुवात केली. गोळीबाराची ही गेल्या दोन महिन्यांमधील दुसरी घटना आहे. यापूर्वी मंगळवार पेठेतील मनामती चौकामध्ये अज्ञातांनी गोळीबार केल्याने तणावपूर्ण परिस्थिती बनली होती. राजवाडा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची सूत्रे गतिमान करून तपास पथके रवाना केली. एलसीबीच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी केली तसेच परिसरातील साक्षीदारांकडे विचारपूस केली आणि सीसीटीव्हीमधील फुटेजही तपासले. संशयित सातारा शहरातील असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. पाटोळे आणि त्याचे दोन साथीदार खंडोबाचा माळ येथे लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. तपास पथकाने तात्काळ या संशयितांना या परिसरात छापा टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता जुन्या भांडणाचा राग मनात धरून मांढरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे संशयितांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने गोळीबार प्रकरणाचा गुन्ह्यातील संशयित पाच तासाच्या आत ताब्यात घेतले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोलबाग परिसरामध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संशयितांना ताहब्यात घेण्याच्या या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, उत्तम दबडे, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, गणेश कापरे, अजित कर्णे, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, स्वप्निल दौंड, शिवाजी गुरव, गणेश कचरे, संभाजी साळुंखे इत्यादींनी भाग घेतला.