जुन्या वादातून तिघांनी केला रिक्षाचालकाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जुन्या भांडणाच्या वादातून एका पस्तीस वर्षीय ॲपेरिक्षा चालकाचा खून झाल्याची घटना घाणेगाव (ता.सोयगाव) येथे घडली आहे. मृत रिक्षाचालकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून घाणेगाव येथील तिघांविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय हरीचंद्र पिंपळे (वय 35 रा.घाणेगाव ता.सोयगाव) असे मयत ॲपेरिक्षा चालकाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, संजय हरीचंद्र पिंपळे हा घाणेगाव ते देऊळगाव गुजरी दरम्यान ॲपरिक्षा चालविण्याचे काम करत असे. शनिवार (दि.2) रोजी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता ॲपेरिक्षा चालविण्यासाठी घाणेगाव येथून देऊळगाव गुजरीला संजय गेला. रात्री नऊ वाजेच्या सुमारास पत्नी अल्काबाई पिंपळे यांनी फोन केला असता त्याने घरीच येत असल्याचे सांगितले. मात्र, रात्री 9:30 वाजेपर्यंत घरी न आल्याने अल्काबाई यांनी संजयला पुन्हा फोन केला. यावेळी फोनवर बोलणे झाले नाही. दरम्यान, रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घाणेगावचे पोलिस पाटील व अल्काबाईचे चुलत दिर रामु पिंपळे हे दोघे घरी आले. त्यांनी तुमच्या रिकाम्या जागेजवळ संजयचा मृतदेह आढळला असल्याची माहिती दिली. अल्काबाई यांनी पुतण्या सागरसह घटनास्थळी धाव घेतली. येथे संजय रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. अल्काबाई व त्यांचा पुतण्या सागर यांनी पोलिसांच्या मदतीने अत्यवस्थ संजयला सावळदबारा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून संजय पिंपळेस मृत घोषित केले.

याप्रकरणी गावातील राजी बाबुलाल पिंपळे, छोटू उर्फ देवलाल बाबुलाल पिंपळे व संदीप श्रावण गणबास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनि रणजित कासले तपास करीत आहेत.

Leave a Comment