मोठी बातमी! गोपीचंद पडळकरानंतर संजय राऊतांवर चप्पलफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार सभेत गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर राज्यात पुन्हा खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातून संजय राऊत गाडीतून बसून जात असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे आता राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

रविवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी हुरडा पार्टी केली. पुढे सोलापुरातील दौरा संपवून माघारी येत असताना संजय राऊत यांच्या कारवर अज्ञात लोकांकडून चप्पलफेक करण्यात आली. संजय राऊत कारमध्ये बसले असताना त्यांच्या कारवर चप्पलांनी भरलेली पिशवी फेकण्यात आल्याची घटना यावेळी घडली. इतकेच नव्हे तर, चप्पलफेक करण्यात आल्यानंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा देत अज्ञात लोक घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, या सर्व घटनेनंतर कार्यकर्ता सागर शिंदे या तरुणाने चप्पलफेक केल्याची कबुली दिली आहे. संजय राऊत हे सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करत असतात त्यामुळे त्यांच्यावर चप्पलफेक केल्याचा दावा या तरुणाने केला आहे. या कबुलीनंतर सागर शिंदे नावाच्या तरुणावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक

संजय राऊत यांच्यापूर्वी गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता १० ते १५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपीचंद पडळकर हे ओबीसी एल्गार मेळावा संपल्यानंतर दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषणाला भेटण्यासाठी जात असताना त्यांच्यावर मराठा आंदोलकांनी चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे धनगर समाजाने आक्रमकाची भूमिका घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.