अखेर मुहूर्त ठरला.. एकनाथ खडसेंचा ‘या’ पक्षामध्ये प्रवेश निश्चित?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. अखेर, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आज जामनेर येथील कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खडसे जाणार का नाही, याचीही चांगलीच चर्चा रंगली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसेंनी सस्पेन्स कायम ठेवला. फडणवीस यांच्या सोबत उपस्थित राहायचे की नाही याबाबत उत्सुकता राहू द्या, आत्ताच सगळे सांगून कसे चालेल, असे खडसेंनी म्हटले होते. त्यामुळे, आजच्या कार्यक्रमाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊंचा प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच, याबाबत अधिकृत घोषणा होईल.

भाजपाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचे सांगत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खडसेंनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर, विधानसभेला तिकीट कापण्यात आल्याचा आरोपही खडसेंकडून फडणवीस यांच्यावरच लावण्यात आला. त्यातच, नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीतही खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, खडसेंच्या संयमाचा बांध फुटला असून त्यांच्या डोक्यातील टीक टीक अखेर राष्ट्रवादीत जाऊन थांबली आहे.

शिवसेनेत तर जाणार नाहीत खडसे ?
मुंबईत खडसे यांची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार यांच्या सोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत चार दिवस थांबून असताना खडसे आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नाही. मध्यंतरी खडसे यांनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून होत होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, उदय सामंत यांच्यासह स्वतः गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसे यांनी याबाबत कोणतेही मत व्यक्त केले नव्हते.

शरद पवारांकडून चाचपणी
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली. मात्र, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”