औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची खेळी यशस्वी ठरली. नितीन पाटील यांना शिवसेनेत घेतल्यानंतर त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड अपेक्षितच होती. पण उपाध्यक्षपदी देखील सत्तार यांनी आपलाच विश्वासू व्यक्ती बसवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदी विजयी झाले, त्यांनी कृष्णा पाटील डोणगावकर यांचा पराभव केला. नितीन पाटील यांची बिनविरोध निवड आणि उपाध्यक्षपदी गाढे यांचा विजय यामुळे सत्तार यांच्या बाबतीत `चीत भी मेरी, पट भी मेरी’, असेच म्हणावे लागेल.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. तर मुळचे शिवसेनेचे असलेले पण विरोधी पॅनलकडून निवडणूक लढलेल्या कृष्णा पाटील व देवयांनी डोणगावकर या निवडून आलेल्या पती – पत्नी जोडीने देखील संचालक म्हणून दुसऱ्यांदा शिववंबधन बांधून घेतले होते. उपाध्यक्षपदासाठी जेव्हा डोणगावकरांनी अर्ज भरला, तेव्हा त्यांच्यावर देखील सत्तारांची कृपा होणार असे वाटत होते. पण अर्जुन गाढे यांनी अर्ज भरला आणि डोणगावकरांच्या आशा मावळल्या. कृष्णा पाटील डोणगावकर यांचा गुप्त मतदानात १३ विरुद्ध सात मतांनी पराभव झाला.
अर्जुन गाढे हे अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अगदी सत्तार काँग्रेसमध्ये असताना गेली पंधरा वर्षे गाढे हे सत्तार यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरताना दिसतात. सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील असलेले अर्जुन गाढे हे मध्यंतरी सत्तार यांच्यावर नाराज होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये उमेदवारी मागून देखील सत्तारांनी त्यांच्या नावावर फुली मारून इतरांना संधी दिली होती.