औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज आठशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1097 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 767 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 330 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 56 हजार 703 झाली आहे. आज तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3665 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5007 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 580 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 500 तर ग्रामीणमधील 80 रुग्णांना सुटी देण्यात आली.