नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक 95 भाजपचे त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 91 नगरसेवक निवडून आले आहेत.

बीड जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे भाजपने तर लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काँग्रेसने यश मिळवले. बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी आष्टी, पाटोदा, शिरूरकासार मध्ये भाजपने एक हाती विजय मिळवत सत्ता कायम राखली, तर वडवणी आणि केज मध्ये सत्तांतर झाले आहे. वडवणी मध्ये राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले. तर केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीने बहुमत मिळवत सत्ताधारी काँग्रेसला ‘जोर का झटका’ दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात तीन पैकी अर्धापूर आणि नायगाव मध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. तर माहूर मध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी परंतु निर्णायक अवस्थेत आहे. जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ठिकाणी यश मिळाले असून, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एका नगरपंचायती वर समाधान मानावे लागले. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन पैकी भाजपने वाशीत तर शिवसेनेने लोहार नगरपंचायतीत बहुमत मिळवले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील दोन नगरपंचायतींपैकी औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये शिवसेनेने बाजी मारली असून, सेनगावात मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सेननाव नगरपंचायत मध्ये 17 पैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी पाच उमेदवार निवडून आल्याने ही नगरपंचायत त्रिशंकू अवस्थेत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव व सोयगाव नगरपंचायत मध्ये शिवसेनेने बहुमत प्राप्त केले. तर परभणी जिल्ह्यातील एकमेव पालम नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळवले.

लातूर जिल्ह्यातील जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि चाकूर या चार नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी आणि भाजपने प्रत्येकी 14, शिवसेना 6, प्रहार 6, आणि अपक्षांनी 5 जागांवर विजय मिळवला आहे. 4 नगरपंचायतीने पैकी देवणी नगरपंचायत भाजपच्या ताब्यातून काँग्रेसने हिसकावली, तर जळकोट वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. चाकूर नगरपंचायत त्रिशंकू असून, फक्त शिरूर आनंतपाळ नगरपंचायतीतील सत्ता राखण्यात भाजपला यश आले आहे. जिल्ह्यातील या चारही नगरपंचायतींवर भाजपची सत्ता होती.

Leave a Comment