हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस राज्यातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की, आज शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. अखेर आज त्याचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या निकालाकडे लागून राहिले आहे.
गेल्या एक दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत आपल्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह 15 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. परंतु या प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी द्यावा असे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशावरून सुरू करण्यात आलेली सुनावणी 20 डिसेंबर रोजी संपली. परंतु आज या सुनावणीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. मुख्य म्हणजे, या निकालात पुढील तीन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
1) सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या घटनेच्या आधारावर मुळे राजकीय पक्ष कोणता असेल हे सर्वात अगोदर ते ठरवावे लागेल.
2) दुसरा मुद्दा असा की, आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंचा व्हीप लागू होईल. तसेच, शिंदे गटाच्या भरत गोगावलेंची नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. यात जर सुनील प्रभूंचा व्हीप लागू झाला तर 16आमदार अपात्र ठरतील.
3) तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, घटनेच्या पक्षांतर बंदीच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात. परंतु, खरी शिवसेना आम्हीच असल्यामुळे आम्हाला पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नाही असे शिंदे गटाने म्हटले आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय कोणाच्या बाजूने देतील हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की या एका निर्णयावरून राज्यातील समीकरणे पुन्हा एकदा पलटणार आहेत. इतकेच नव्हे तर या एका निर्णयाचा परिणाम आगामी निवडणुकांवर देखील पडणार आहे.